Maharashtra Politics : पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकालाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी राजकीय खेळी केली आहे. बहुजन विकास आघाडीचे (बीव्हीए) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाने मोठा भगदाड पाडले आहे. बीव्हीएचे माजी नगरसेवक विमल पाटील आणि केशव पाटील यांच्यासह सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना पालघर जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण चिन्ह हाती घेतले. निवडणुकीच्या तोंडावर बीव्हीएला बसलेला हा धक्का ठाकूर यांच्या डोकेदुखीत मोठी भर पाडणारा ठरला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढली असून, स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, नवी मुंबईतही शिंदे गटाने राजकीय कंबर कसली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शहरात पक्षबांधणीला वेग दिला आहे. आज नवी मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध पक्षांतील दिग्गज नेते आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या सोहळ्याला प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, नवी मुंबईत शिवसेनेची राजकीय ताकद आणखी बळकट होणार आहे.


