BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात ‘ठाकरे बंधूंच्या’ युतीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दादरमधील शिवसेना भवनात राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची घडामोड घडणार असून, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्रितपणे युतीच्या २२७ उमेदवारांना विजयाचा मंत्र देणार आहेत. विशेष म्हणजे, उद्या (४ जानेवारी) मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः शिवसेना भवनात पाऊल ठेवणार असून, यावेळी युतीचा संयुक्त ‘जाहीरनामा’ प्रसिद्ध केला जाणार आहे.
शिवसेना भवनात रंगणार युतीचा मेळावा
आज दुपारी २ वाजता शिवसेना भवनात मनसे नेते अमित ठाकरे दाखल होतील. तिथे आदित्य ठाकरे आणि ते मिळून शिवसेना (UBT), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करतील. ठाकरे घराण्यातील ही नवी पिढी पहिल्यांदाच अशा प्रकारे अधिकृतपणे एकत्रित निवडणूक रणनिती आखताना दिसत आहे.
हेही वाचा – ठाकरे बंधूंना मुंबईत धक्का! मनसेच्या ११ जुन्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; सर्व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांची रणनीती
१५ जानेवारीला होणाऱ्या २९ महापालिकांच्या मतदानासाठी ठाकरे बंधूंनी कंबर कसली आहे. ५ जानेवारी रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली भव्य संयुक्त सभा पार पडणार आहे. या सभेतून महायुती सरकारवर थेट हल्ला चढवला जाणार आहे. १ जानेवारीला उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली, तर त्याआधी राज ठाकरे स्वतः ‘मातोश्री’वर गेले होते. या भेटींमुळे ही युती केवळ कागदोपत्री नसून जमिनीवरही तितकीच भक्कम असल्याचे संकेत मिळत आहेत.
महायुतीचेही शक्तिप्रदर्शन
ठाकरे बंधूंच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी महायुती (भाजप आणि शिंदे गट) सज्ज झाली आहे. उद्या वरळीतील ‘डोम’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संयुक्त मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुती मुंबईत आपल्या प्रचाराचे अधिकृत रणशिंग फुंकणार आहे. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असल्याने महायुतीने प्रचाराच्या सुरुवातीसाठी याच ठिकाणाची निवड करून मोठे आव्हान उभे केले आहे.


