मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या (शिवसेना उबाठा आणि मनसे) युतीला वांद्रे भागात मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मध्ये मनसेच्या ११ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सर्व पदांवरून राजीनामा दिला आहे.
प्रभाग ९७ हा ठाकरे सेनेला गेल्याने तर प्रभाग ९८ मधील उमेदवार दीप्ती काते यांना विरोध असल्याने हे राजीनामे देण्यात आले. यातील प्रभाग ९७ मधील सर्व जुन्या नेत्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मनसेच्या स्थापनेपासून सक्रिय असलेले हे पदाधिकारी नाराज होते. “मशाल चिन्हावर उमेदवारी दिल्याने आम्हाला पक्षात स्थान नाही,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला. प्रभाग ९७ मधून ठाकरे सेनेचे बाळा चव्हाण रिंगणात आहेत, तर भाजपकडून हेतल गाला उमेदवार आहेत. प्रभाग ९८ मधून मनसेच्या दीप्ती काते यांना तिकीट मिळाल्यानेही काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला.
या घटनेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीत अंतर्गत नाराजी उघड झाली आहे. मनसेने मुंबईत सुमारे ५०-६० जागांवर उमेदवार उभे केले आहेत, मात्र काही ठिकाणी युतीधर्म पाळत जागा सोडल्या. या राजीनाम्यांमुळे महायुतीला अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे.
मनसेच्या मुंबईतील काही प्रमुख उमेदवार
– वॉर्ड ८ – कस्तुरी रोहेकर
– वॉर्ड १० – विजय कृष्णा पाटील
– वॉर्ड ११ – कविता बागुल माने
– वॉर्ड १४ – पुजा कुणाल माईणकर
– वॉर्ड ९८ – दीप्ती काते
– (एकूण सुमारे ५० उमेदवारांची यादी जाहीर)
१५ जानेवारीला मतदान असून, या घडामोडींमुळे वांद्रे भागातील लढत आणखी रोचक झाली आहे. राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.


