पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. “पालकमंत्री एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त व्हावे म्हणतात, दुसरीकडे पूर्व ते पश्चिम उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे,” असा हल्ला मोहोळांनी चढवला.
यावर भाजपमधून राष्ट्रवादीत (अजित पवार गट) गेलेल्या अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियावर रोखठोक प्रत्युत्तर दिले. “गुन्हेगारांना विदेशात पळवणाऱ्या आक्याला बाजूला घेऊन बसणाऱ्या खासदारांनी दादांना राजकारण शिकवू नये. तुमच्या काठावर निवडून येण्यात राष्ट्रवादीचा वाटा आहे, ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी भूमिका घेऊ नका,” असे बालवडकर म्हणाले.
बालवडकरांची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली असून, त्यांनी मोहोळांना थेट आव्हान दिले आहे. “मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या सुसंस्कृत खासदारांनी दादांना शिकवू नये. यापुढे बोललात तर जसेच तसे उत्तर देईल,” असा इशारा त्यांनी दिला. हे प्रत्युत्तर बालवडकरांच्या तिकीट कापण्यावरून आले आहे. प्रभाग ९ मधून त्यांना भाजपने तिकीट नाकारून त्यांच्या भावकीतील लहू बालवडकरांना दिले. शेवटच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आल्याने बालवडकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भाजपच्या अंतर्गत गोंधळावरही बालवडकरांनी टीका केली. “भाजपने मला कार्यकर्त्यापासून नगरसेवक बनवले, आता तिकीट नाकारून राष्ट्रवादीचा नेता बनवले. पक्षाचे नुकसान झाले,” असे ते म्हणाले. मोहोळांच्या टीकेमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली असून, १५ जानेवारीच्या निवडणुकीत हे वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. राजकीय वर्तुळात या प्रत्युत्तराची जोरदार चर्चा सुरू आहे.


