मुंबई : मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील लालजीपाडा भागातील तारकेश्वर महादेव मंदिरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरातील पुजारी राजेश गोस्वामी (५२) यांनी एका १९ वर्षीय कॉलेज तरुणीला आक्षेपार्ह संदेश पाठवून पूजेच्या बहाण्याने घरात बोलावले आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, गुन्हा दाखल होण्याच्या आणि बदनामीच्या भीतीने गोस्वामी यांनी मंदिरातच पंख्याला दोर लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, कांदिवली पोलिस तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गोस्वामी हे गेल्या पाच वर्षांपासून तारकेश्वर महादेव मंदिरात पूजा-पाठ करत होते. ते मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी असून, विवाहित होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या, ज्यात एक मुलगा देखील पुजारी आहे. गोस्वामी यांच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी होती. तरुणी ही मंदिरात नियमित दर्शनासाठी येणारी कॉलेज विद्यार्थिनी असून, पुजाऱ्याने तिला मोबाईलवरून आक्षेपार्ह संदेश पाठवले होते.
त्यानंतर पूजेच्या बहाण्याने घरात बोलावले आणि शरीरसुखाची मागणी केली. भयभीत तरुणीने घरी सांगितल्यानंतर आई-वडिलांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हा दाखल होण्याची कळताच गोस्वामी यांनी शनिवारी सकाळी मंदिरात एकटे असताना पंख्याला दोर लावून जीवन संपवलं.
कांदिवली पोलिसांनी दुर्घटना मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला असून, गोस्वामी यांचे शवविच्छेदन कोपरखैरणे रुग्णालयात करण्यात आले. घटनास्थळी आत्महत्या पूर्वीचा कोणताही पत्र सापडला नाही. प्राथमिक तपासात शारीरिक विनयभंगाचा आरोप समोर आला असून, पोलिस इतर तरुणींच्या तक्रारी शोधत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलांशी बोलणी सुरू असून, गोस्वामी यांच्या मोबाईलमधील संदेश आणि कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत.


