मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत पाच दिवस ठाण मांडून बसलेले मराठा आंदोलक मंगळवारी (२ सप्टेंबर) माघारी परतले. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्याने आपले उपोषण सोडले आणि रात्री मुंबई सोडली. मात्र, आंदोलनादरम्यान आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि दक्षिण मुंबईतील अनेक भागांत निर्माण झालेल्या गोंधळामुळे मुंबई पोलिसांनी आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव आणि दमदाटीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आंदोलनामुळे मुंबई ठप्प झाली असताना आता पोलिसांच्या या कारवाईने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव ११,००० हून अधिक वाहनांसह मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात मर्यादित जागा असल्याने आंदोलकांनी CSMT, मरिन ड्राइव्ह, मंत्रालय, आमदार निवास आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज परिसरात गर्दी केली. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली, तर अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक आणि आंदोलकांमध्ये खटके उडाले. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला ५,००० लोकांसाठी परवानगी दिली होती, परंतु ४०,००० हून अधिक आंदोलक जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
मराठा आंदोलकांनी रस्त्यांवर स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, खेळ खेळणे आणि वाहने बेकायदेशीरपणे उभी करणे अशा गोष्टी केल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. बॉम्बे हायकोर्टाने १ सप्टेंबर रोजी आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे आणि आझाद मैदान सोडण्याचे आदेश दिले होते, कारण शहर “अक्षरश: ठप्प” झाले होते.
मरिन ड्राइव्ह आणि डोंगरी पोलिसांनी आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव आणि दमदाटीप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय, जुहू परिसरात रविवारी (३१ ऑगस्ट) बेस्ट बस प्रवाशांशी झालेल्या हाणामारीच्या घटनेत आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही घटना आंदोलनादरम्यानचा पहिला गुन्हा ठरली.


