Asha Bhosle Funeral : भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे दुपारी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
आज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या.
आशाताई हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बहुआयामी (वर्सटाईल) गायिका म्हणून ओळखल्या जात होत्या. तब्बल सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी गायली. हिंदीसोबतच मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली.
त्यांनी आर. डी. बर्मन, ओ. पी. नैय्यर, सचिन देव बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत अनेक अजरामर गाणी दिली.
आज त्यांच्या अंतिम दर्शनासाठी संगीत, चित्रपट, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह हजारो चाहते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


