Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी भाजपला “बोगस जनता पार्टी” संबोधत, प्रामाणिक निवडणूक झाल्यास भाजपला महाराष्ट्र जिंकणे अशक्य असल्याचा दावा केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपचे “ढोंग” उघडे पाडल्याचे सांगत ठाकरे यांनी मतचोरीविरोधात सावध राहण्याचे आवाहन केले.
पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार का?
ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या चर्चेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कबुतर, कुत्रे, हत्ती यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारे लोक माणुसकी विसरतात का? गरम सिंदूर वाहत असल्याचे बोलतात, पण आता जय शाह यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी विचारले, “जगभरात आपले शिष्टमंडळ गेले, पण एकही देश आपल्या बाजूने उभा आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
सैनिकांचे श्रेय लाटणाऱ्या भाजपवर टीका
ठाकरे यांनी भाजपवर सैनिकांचे शौर्य लाटल्याचा आरोप केला. सोफिया कुरेशी यांच्यासारख्या सैन्य अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांची बहीण म्हणणारे भाजपचे गधडे आहेत. तसेच, रशिया-अफगाणिस्तान ऑलिम्पिक बहिष्काराचा दाखला देत देशाने ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. “ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानसोबत चीनही होता. यावर निषेध का नाही?” असा सवाल करत त्यांनी भाजपच्या शिक्षण आणि नेतृत्वावरही निशाणा साधला. “चांगले शिक्षक मिळाले असते, तर ही अवस्था नसती,” असा टोला ठाकरेंनी लगावला.
बांगलादेश घुसखोरीवरूनही हल्लाबोल
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारताने आसरा दिला नसल्याचे सांगत ठाकरे यांनी भाजपवर भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा देण्याचा आरोप केला. “या सर्वांची कीव येते, पण कोणाची कीव येते हे कळत नाही,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


