नवी दिल्ली : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या आहेत. या कंपन्या आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सध्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ केली आहे. तर काही कंपन्यांनी त्यांचा स्वस्तातील पॅक बंद केल्याचे समोर आले आहे. Jio आणि Airtel या दोन बड्या कंपन्यांनी पॅकमध्ये दरवाढ करून ग्राहकांना मोठा दणका दिला आहे.
Jio आणि Airtel या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे सर्वात स्वस्त कॉल आणि डेटा प्लॅन बंद केले आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशावर पुन्हा एकदा भार वाढणार आहे. काही दिवसांपूर्वीच Jio ने त्यांचा सर्वात स्वस्त 249 रिचार्ज प्लॅन बंद केला होता, ज्यामध्ये युजर्सना 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1GB डेटा आणि अमर्यादित कॉलचा लाभ मिळत होता. त्यानंतर लगेचच, Airtel ने 24 दिवसांच्या वैधतेसह त्यांचा 249 रुपयांचा प्लॅन बंद करण्याची घोषणा केली, ज्यामध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलसह दररोज 100 SMS सह 1GB डेटा दिला जात होता.
आता Jio आणि Airtel ग्राहकांना 28 दिवसांचा बेस पॅक रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. 249 रुपयांचा जुना पॅक बंद झाल्यानंतर, आता ग्राहकांना बेस पॅक रिचार्ज करण्यासाठी 50 रुपये जास्त खर्च करावे लागतील. जिओ आणि एअरटेलच्या वेबसाइटनुसार, आता सर्वात स्वस्त प्लॅन 299 रुपये आहे.
जिओच्या बेस पॅकची नवीन किंमत काय?
जिओचा २८ दिवसांचा बेस पॅक आता २९९ रुपयांपासून सुरू होतो. यामध्ये तुम्हाला २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएसचा फायदा मिळेल. या पॅकमध्ये तुम्ही एकूण ४२ जीबी डेटा वापरू शकाल.
एअरटेलच्या बेस पॅकची नवीन किंमत 279
आता एअरटेलमध्ये २८ दिवसांचा सर्वात किफायतशीर प्लॅन २७९ रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज १ जीबी ५जी डेटासह अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळत आहे. यासोबतच, तुम्हाला नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार आणि झी५ चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.


