मुंबई : महाराष्ट्रात हिवाळ्याचा कडाका वाढत असून, उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट जाणवू लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे या हंगामातील नीचांकी तापमान ४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नाशिक शहरात ६.९ अंश तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या मते, कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहील.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली होती. मन आणि महेशा नद्यांवर धुके दाटले असून, दृश्यमानता कमी झाली. शहरातील तापमान १० अंशांच्या खाली घसरले, ज्यामुळे नागरिकांना आल्हाददायक पण थंडगार वातावरणाचा अनुभव आला. आज नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यानही या थंडीचा परिणाम जाणवला.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत किमान तापमान ८.३ अंशांपर्यंत घसरले. पाषाणमध्ये ८ अंश, लोहगाव १३ अंश, चिंचवड १४ अंश, मगरपट्टा १५ अंश आणि कोरेगाव पार्कमध्ये १३ अंश तापमान नोंदवले गेले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवरही गारठा जाणवत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या हवामान कोरडे राहील. कमाल तापमान २९ अंशांपर्यंत, तर किमान तापमान ८ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत कमाल तापमानात किंचित वाढ होईल, मात्र किमान तापमानात मोठा बदल होणार नाही. पुढील ७ दिवस थंडीची ही स्थिती कायम राहणार असल्याने नागरिकांनी गरम कपडे आणि आवश्यक काळजी घ्यावी.


