मुंबई : ख्रिसमस, नवीन वर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी होणार असतानाच इंडिगोच्या शेकडो उड्डाणे रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. पुढील चार दिवसांत मुंबई आणि पुणे विभागातून एकूण १४ विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या दिल्ली, बेंगळुरू, लखनऊ, मडगाव, नागपूर, हैदराबाद आणि गोरखपूरपर्यंत पोहोचणार आहेत.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “इंडिगोच्या उड्डाण रद्दीकरणामुळे आणि सणासुदीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने हे १४ फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व गाड्यांमध्ये वातानुकूलित प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी, शयनयान आणि सामान्य डबे असतील.”
मुंबई-पुण्यातून धावणाऱ्या प्रमुख विशेष गाड्या
– ०१०१५ लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ स्पेशल : ६ डिसेंबर, दुपारी १२.१५ वा.
– ०१०७७ छ.शि.म. टर्मिनस – हजरत निजामुद्दीन (दिल्ली) स्पेशल : ६ डिसेंबर, सायं. ५.१५ वा.
– ०१४१३ पुणे – बेंगळुरू स्पेशल : ६ डिसेंबर, सायं. ७.०० वा.
– ०१०११ छ.शि.म. टर्मिनस – नागपूर स्पेशल : ७ डिसेंबर, दुपारी ३.३० वा.
– ०१०१९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव स्पेशल : ७ डिसेंबर, सकाळी ११.१० वा.
– ०१०२३ लोकमान्य टिळक टर्मिनस – हैदराबाद स्पेशल : ७ डिसेंबर, सायं. ५.२० वा.
– ०१४०९ पुणे – हजरत निजामुद्दीन (दिल्ली) स्पेशल : ७ डिसेंबर, रात्री ८.२० वा.
याशिवाय नागपूर, गोरखपूर, बिलासपूरहून मुंबईकडे येणाऱ्या रिटर्न फेऱ्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. बुकिंग आज सकाळपासून IRCTC वेबसाइट आणि PRS काउंटरवर सुरू झाली असून काही तासांतच अनेक गाड्यांमधील वातानुकूलित डब्यांची वेटिंग लिस्ट वाढली आहे. सामान्य डब्यांचे तिकीट UTS अॅपवरूनही काढता येईल.
रेल्वे प्रशासनाने सर्व स्टेशनांवर अतिरिक्त कर्मचारी, वैद्यकीय पथक आणि हेल्प डेस्क तैनात केले आहेत. प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, स्टेशनावर किमान १ तास आधी पोहोचावे. सुट्टीच्या सीझनमध्ये घराकडे जाणाऱ्या आणि गोव्यात फिरायला जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी या १४ विशेष गाड्या खऱ्या अर्थाने ‘ख्रिसमस गिफ्ट’ ठरणार आहेत.


