उत्तर गोवा : अर्पोरा येथील एका प्रसिद्ध नाईटक्लब-सह-रेस्टॉरंटमध्ये शनिवारी मध्यरात्री १२ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २० पुरुष आणि ३ महिलांसह एकूण २३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विदेशी पर्यटक आणि बेसमेंटमध्ये काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. जखमींना त्वरित गोवा मेडिकल कॉलेज आणि इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोहोचलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दु:ख व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटले, “पर्यटनराज्य गोव्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी घटना आहे. दोषी कोणही असला तरी त्याला सोडले जाणार नाही.”
स्थानिक भाजप आमदार मायकल लोबो यांनीही घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले, “गोव्यातील सर्व नाईटक्लब, बार आणि रेस्टॉरंट्सचे तातडीने सुरक्षा ऑडिट करणे गरजेचे आहे. पर्यटक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षाच सर्वोच्च प्राधान्य आहे. अशी भयानक घटना पुन्हा घडता कामा नये.”
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले असून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलिंडरचा स्फोट हे आगीचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.


