Local Body Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक महत्त्वपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या धक्कादायक निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मनसेसोबत कोणतीही युती न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच युती करण्याचे एकमत सर्व नेत्यांनी व्यक्त केले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य युतीची चर्चा पूर्णविरामाला गेली आहे.
या निर्णयाची माहिती लवकरच दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाला दिली जाणार आहे. काँग्रेसचा हा निर्णय समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता सर्वांचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. ठाकरे काँग्रेससोबत राहणार की पुन्हा राज ठाकरे यांच्या मनसेकडे वळणार? या चर्चांना सध्या जोर आला आहे.
उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? भावासोबत की काँग्रेससोबत?
उद्धव यांनी नुकतेच (१ नोव्हेंबर) मुंबईतील ‘सत्याचा मोर्चा’त राज ठाकरेंसोबत एकत्र येऊन मतदार याद्यांमधील घोळ आणि ‘मतचोरी’विरोधात आंदोलन केलं. या मोर्च्यात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (युबीटी) यांच्यासह मनसेही सहभागी होती. उद्धव यांनी स्पष्ट सांगितलं की, ही एकता मतदार, मराठी मानूस, हिंदू आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. ते म्हणाले, “आम्ही एकत्र आलो आहोत, कारण बीजेपीची ‘अनकॉन्डा’ धोरण रोखायचं आहे
.”मात्र, काँग्रेसच्या नकारामुळे उद्धव यांना आता कठीण परिस्थिती आहे. ते भाव राज ठाकरेंसोबत जाणार की काँग्रेससह एमव्हीए मजबूत ठेवणार? राजकीय निरीक्षकांचं मत आहे की, उद्धव युबीटी आणि मनसे यांची युती मुंबईसारख्या शहरात बीजेपीला आव्हान देऊ शकते, कारण ठाकरे ब्रँडची ताकद आहे.


