मुंबई: दसरा मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर केलेल्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. बाळासाहेबांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीत ठेवले गेले आणि हातांचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. यामुळे उद्धव ठाकरे गटाने मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली.
मात्र, या ‘बुमरँग’ विधानाने शिंदे गटातील नेत्यांनी कदमांपासून अंतर ठेवले असून, त्यांच्या सारवासारवमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपलाही या प्रकरणाची झळ बसू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दसरा रॅलीतील रामदास कदमांचे आरोप काय?
३ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात कदम यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला. “बाळासाहेबांचा मृत्यू दोन दिवस आधी झाला होता, पण त्यांचे पार्थिव मातोश्रीत ठेवून हातांचे ठसे घेतले गेले. डॉक्टरांनी हे सांगितले, मातोश्रीतही चर्चा झाली,” असे ते म्हणाले.
त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले की, “मी त्यांना बाळासाहेबांच्या पायांचे ठसे घेण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी हातांचे घेतले. हे ठसे कशासाठी वापरले? माझ्यावर आणि उद्धववर नार्को टेस्ट व्हावी, सत्य बाहेर येईल,” असा आव्हानही दिले. या विधानाने शिवसेना-यूबीटीमध्ये संतापाची लाट उसळली. “हे बाळासाहेबांवरील विश्वासघात आहे,” असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले, तर उद्धव ठाकरेंनी कदमांना ‘गद्दार’ आणि ‘नमकहराम’ म्हटले.
वादग्रस्त विधानानंतर शिंदे गटाचे मौन
या वादग्रस्त विधानानंतर शिंदे गटातील वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर आणि अर्जुन खोतकर यांनी मौन बाळगले. कदमांच्या आरोपांमुळे या नेत्यांच्या ‘निष्ठा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर हे नेते मंत्री झाले, मग त्यांनी हा कथित प्रकार का सहन केला? ते गप्प का राहिले?” असा सवाल उपस्थित होत आहे. कदमांनी जणू आपल्या गटातील नेत्यांच्या नैतिकतेवरच टीका केल्यासारखे चित्र आहे, ज्यामुळे शिंदे गटाने कदमांपासून अंतर ठेवले.
मानहानीचा खटला दाखल करू, उद्धव गटाचा पलटवार
४ ऑक्टोबरला अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. “बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर झाल्यावर मी आणि डॉक्टर उपस्थित होतो. हे खोटे आरोप आहेत, कदमांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करू. केस जिंकल्याची रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांना देऊ,” असे परब म्हणाले. परब यांनी कदमांच्या मुलाला २०१९ च्या निवडणुकीत उद्धवांनी तिकीट दिल्याचा उल्लेख करत, “आज ते आमच्यावरच हल्ला करतात?” असे म्हटले.
बाळासाहेब माझे दैवत, कदमांची सारवासारव
वाद वाढल्यानंतर कदम यांनी ४ ऑक्टोबरला पुन्हा पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. “बाळासाहेब माझे दैवत आहेत. मी फक्त संशय व्यक्त केला, गैर काय? उद्धव ठाकरे गप्प का आहेत? दिवाळी साजरी करण्यासाठी पार्थिव दोन दिवस ठेवले, हे त्यांनी जनतेला सांगावे. मी सीबीआय चौकशीची मागणी करतो, नार्को टेस्टसाठी तयार आहे,” असे ते म्हणाले.


