Eknath Shinde : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
दिल्लीत सोमवारी रात्री झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या काही खासदारांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात मंत्रीपद मिळावे यासाठी काही खासदार प्रयत्नशील असल्याने शिंदे यांनी त्यांची खरडपट्टी काढली.
शिंदे म्हणाले, “आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्या कामावर माझं लक्ष आहे. तुमच्या सर्वांच्या कामाचे विश्लेषण होत आहे. पक्षाची आणि सरकारची बाजू संसदेत जोरदारपणे मांडा. पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहून मुद्दे मांडा. काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो, हे सर्वांना लागू होईल.”
राहुल शेवाळेंची नाराजी
शिवसेना खासदार राहुल शेवाळे सध्या पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाणारे नेते असून, त्यांना मोठी जबाबदारी मिळेल अशी चर्चा आहे. मात्र, ते प्रचंड नाराज असल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्री उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शेवाळे यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत पोहोचल्यानंतर शेवाळे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची नाराजी दूर झाली की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.


