मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यावर बुधवारी (१७ सप्टेंबर) जोरदार हल्ला चढवला. मारकडवाडी प्रकरणात निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण केल्याबद्दल शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केली.
“शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे, हे त्यांच्याकडून शिकता येईल,” असा थेट हल्ला त्यांनी केला. निवडणूक ही देशाचा गाभा असून, त्यावर षड्यंत्र करणे म्हणजे देशद्रोह असल्याचे सांगून, पडळकर यांनी पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा पुन्हा केली.
मारकडवाडी प्रकरण आणि ईव्हीएमवर शंका
पडळकर यांनी म्हटले की, मारकडवाडीतील ईव्हीएम विरोधी आंदोलनात शरद पवारांनी दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या प्रतिष्ठित संस्थेवर शंका निर्माण केली. “ज्या पवारांनी देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर षड्यंत्र करून शंका घेण्यास भाग पाडले, त्यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हे देशद्रोह आहे,” असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, “शरद पवार हे आधुनिक काळातील नारदमुनी आहेत. एकीकडे मंडल यात्रा, दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी नातूंचे आंदोलन ही दुटप्पी भूमिका आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे प्राबल्य आहे, पण ईव्हीएम आल्या तर ते संपेल. म्हणूनच ते ईव्हीएमवर शंका निर्माण करतात.” पडळकर यांनी पवारांना आव्हान देत सांगितले की, जर ईव्हीएमवर विश्वास नसेल, तर सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील यांनी आपले पद सोडावे.
‘दोन लोकांची भेट’, पडळकरांचा सवाल
पडळकर यांनी शरद पवारांच्या अलीकडील विधानावरूनही प्रश्न उपस्थित केले. पवार यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत १६० आमदार निवडून आणण्याची ऑफर देण्यासाठी दोन लोक त्यांच्याकडे आले होते. “त्यांनी तात्काळ गृहमंत्र्यांना फोन केला पाहिजे होता, पण पवारांनी राहुल गांधींना सांगितले. निवडणुकीनंतर आठ महिने झाल्यानंतर ही गोष्ट सांगितली.
हे षड्यंत्र आहे का? आता ते लोक कोण होते, हे आठवत नाही असं म्हणतात. पण ५० वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवतात, मग आठ महिन्यांपूर्वीच्या भेटीचं काय?” असा सवाल पडळकर यांनी विचारला. ते म्हणाले, “चिठ्ठ्या गिळता येतात, पळवता येतात – सहकारात पवारांचे प्राबल्य आहे, पण आता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?”


