मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक देण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आझाद मैदानात 29 ऑगस्टला नियोजित आंदोलनासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम असून, 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाने 26 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांना आझाद मैदानात पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास मनाई केली आहे. “शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे,” असं खंडपीठाने नमूद केलं आहे. तसेच मनोज जरांगे यांना खारघर किंवा नवी मुंबईसारख्या पर्यायी जागी आंदोलनाची परवानगी देण्याचा निर्णय सरकारवर सोपवण्यात आला आहे. गणेशोत्सवामुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
आम्ही 100 टक्के मुंबईत जाणार : जरांगेंचा निर्धार
हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, “आम्ही कायदा आणि संविधानाचे नियम पाळून आंदोलन करू. आम्ही 100 टक्के मुंबईत जाणार आहोत. न्यायदेवतेचा आदर करू, कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही. आमचे वकील न्यायालयात जाऊन परवानगी मिळवतील. जनतेचे गाऱ्हाणे न्यायदेवता ऐकेल.” जरांगे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “हा सरकारचा खेळ आहे, न्यायदेवतेचा नाही. आमच्या मागण्या रास्त आणि कायदेशीर आहेत.”
मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या काय?
मराठा-कुणबी एकच: मराठा आणि कुणबी एकच असल्याची अंमलबजावणी व्हावी.
हैदराबाद आणि बाँबे गॅझेटियर लागू करा: गॅझेटियरच्या आधारावर आरक्षणाची अंमलबजावणी करावी.
सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी: कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांचे सगे-सोयरे यांना आरक्षणाचा लाभ द्यावा.
गुन्हे मागे घ्या: मराठा आंदोलकांवरील खटले मागे घ्यावेत आणि बलिदान दिलेल्या कुटुंबांना आधार द्यावा.
कायदेशीर आरक्षण: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळावे.
जरांगेंचा आंदोलनाचा रोडमॅप
27 ऑगस्ट: सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटी येथून निघून पैठण, शेवगाव (अहिल्यानगर), कल्याण फाटा, आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर) येथे मुक्काम.
28 ऑगस्ट: खेड, चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर मार्गे रात्री आझाद मैदानात पोहोचणार.
29 ऑगस्ट: सकाळी 10 वाजता आझाद मैदानात आंदोलन सुरू होणार.
सरकारकडून जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे. सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेतून कोणता तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


