मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईला कूच करणाऱ्या मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आझाद मैदानात पुढील दोन आठवड्यांसाठी आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर जोरदार टीका करत त्यांना थेट आव्हान दिले आहे. “जरांगे माजले आहेत, त्यांची भाषा मग्रुरीची आहे. आता तू आंदोलन करू शकत नाहीस,” असा टोला सदावर्तेंनी लगावला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या योजनेवर पाणी फिरवलं आहे. पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. गणेशोत्सवामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, नवी मुंबई, खारघर किंवा अन्यत्र आंदोलनासाठी परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकत, असंही कोर्टाने आदेशात नमूद केलं आहे.
गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर घणाघात
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, जरांगे याच आंदोलन दिसायला सामाजिक असले तरी त्याचा आत्मा राजकीय आहे. त्यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा हात आहे. जरांगे कुणाच्यातरी हातातील बाहुली बनली आहे. सदावर्तेंनी पुढे सांगितले की, जरांगेंनी महिलांबाबत आक्षेपार्ह टीका केली आहे आणि त्यांच्या बेकायदा कृत्यांना आता आळा घालण्याची वेळ आली आहे. “जरांगेंना अटक झाल्याशिवाय त्यांना कायद्याची जाणीव होणार नाही,” असा इशाराच सदावर्ते यांनी दिला आहे.
जरांगे कोणत्याही कायद्यापेक्षा मोठे नाहीत सदावर्ते
सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली. “मनोज जरांगे हे कोणत्याही कायद्यापेक्षा मोठे नाहीत,” असं सदावर्ते यांनी ठणकावून सांगितलं आहे.


