Rain Alert : महाराष्ट्रावरून मोंथा चक्रीवादळाचे संकट टळल्याने पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून ढगाळ हवामान राहिले असून, काही भागांत हलक्या सरी कोसळल्या.
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह कमाल-किमान तापमानात चढ-उतार अपेक्षित आहेत. हवामान विभागाने येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे.
गेल्या आठवडाभर समुद्रात धुमाकूळ घालणारे मोंथा चक्रीवादळ आता शांत झाले असून, दोन्ही समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यांचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा वेग मंदावणार आहे. कालच्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार सरी पडल्या. धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे सर्वाधिक ५० मिमी पावसाची नोंद झाली.
पावसामुळे राज्याच्या कमाल तापमानात घट होत असून, बहुतांश ठिकाणी पारा ३० अंश सेल्सिअसखाली आला आहे. किमान तापमानही हळूहळू कमी होत असून, पहाटे थंड वारे जाणवत आहेत. सोलापूरमध्ये कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस, तर महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
आज मुंबई-उपनगरासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर; तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा आहे. उर्वरित भागांत ढगाळ हवामानासह ऊन-पावसाचा खेळ कायम राहील, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.


