Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे आपला पती घटस्फोट देण्यासाठी तयार नसल्यामुळे महिलेने त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी पत्नीने तिचे भाऊ आणि आणखी दोन साथीदारांसोबत मिळून योजनेनुसार पतीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी महिलेसह आणखी चार लोकांना अटक केल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीचं नाव टिप्पन्ना असून ते कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील सिरुगुप्पा गावात राहत होते.
महिलेला पतीपासून घटस्फोट हवा होता..
25 नोव्हेंबर रोजी मुंबई-नाशिक हायवेजवळ पोलिसांना एक अर्धवट जळालेला आणि कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, तपासादरम्यान पीडित तरुणाचे त्याची पत्नी हसिना मेहबूब शेखसोबत सतत कौटुंबित वाद होत असल्याचं समोर आलं. दोघे एकमेकांपासून वेगळे राहत असून हसीनाला आपल्या पतीपासून घटस्फोट हवा होता. मात्र, टिप्पन्नाने घटस्फोट देण्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि याच कारणामुळे पतीची निर्दयी हत्या करण्यात आली.
भाऊ आणि साथीदारांसोबत मिळून पतीच्या हत्येची योजना
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिचा 35 वर्षीय भाऊ फैयाज जाकिर हुसैन शेख आणि आणखी दोन साथीदारांसोबत मिळून पतीच्या हत्येची योजना आखली. प्लॅनिंगनुसार, 17 नोव्हेंबर रोजी फैयाज त्याच्या साथीदारांसोबत मिळून पीडित टिप्पन्नाला घेऊन फिरायला गेला. आरोपी त्याला शहापूरजवळील एका निर्जन जंगलात घेऊन गेले आणि तिथेच त्याची हत्या करण्यात आली.
हत्येनंतर, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणाचा मृतदेह पूर्णपणे जळला नाही. त्यानंतर, आरोपींनी तो मृतदेह हायवेच्या कडेला फेकून दिला.
पोलिसांची माहिती
पोलिसांच्या तपासादरम्यान, टेक्निकल सर्व्हिलांस आणि चौकशीतून आरोपींची ओळख समोर आली. त्यानंतर, आरोपी पत्नी हसीना आणि तिच्या साथीदारांविरुद्ध IPC च्या कलम 103(1) (हत्या) आणि 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान, आरोपी फैयाजने त्याच्या बहिणीच्या सांगण्यावरून साथीदारांसोबत मिळून टिप्पन्नाची हत्या केल्याचं कबूल केलं. पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती आहे.


