IMD predicts severe winter in Maharashtra : पावसाने काढता पाय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये तापमान सातत्याने घटताना दिसत आहे. नाशिक, पुणे, मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पारा सरासरीपेक्षा कमी झाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच ते सहा दिवसांत राज्यात थंडी आणखी वाढणार असून २ ते ३ अंशांनी तापमान घटेल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यंदा ‘ला नीना’ या हवामान घटकामुळे मागील २५ वर्षांतील सर्वाधिक थंडी पडू शकते.
सध्या मुंबईत धुक्याची चादर पसरली असून वातावरण अंशतः ढगाळ आहे. नाशिक, महाबळेश्वर, सांगली आणि साताऱ्यात अनेक ठिकाणी पहाटेच्या सुमारास घनदाट धुके दिसत आहे. निफाड परिसरात तापमानात प्रचंड घसरण झाली आहे.
विदर्भात थंडीची चाहूल आणखी तीव्र होत असून नागपूरमध्ये किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. मात्र, दक्षिण कोकण आणि दक्षिणमध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण राहील. मुंबईचे कमाल तापमान ३२ अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस असेल. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


