मुंबई : नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूरच्या रेणापूर येथे बदली झालेल्या तहसीलदार प्रशांत थोरात यांचे एका व्हायरल व्हिडिओमुळे निलंबन करण्यात आले आहे. थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभात तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीवर बसून ‘याराना’ चित्रपटातील गाणे गाताना आणि अंगविक्षेप करताना दिसले.
हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामुळे त्यांच्या वर्तनाला शासकीय अधिकाऱ्याच्या पदाला शोभणारे नसल्याचे कारण देत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे तात्काळ निलंबन केले. मात्र, याचवेळी जालना येथील पोलीस उपअधीक्षक (DYSP) अनंत कुलकर्णी यांनी आंदोलक शेतकऱ्याला लाथ मारल्याच्या घटनेवर अद्याप कारवाई न झाल्याने प्रशासकीय कारवाईत दुजाभाव होत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, प्रशांत थोरात यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी उमरी येथील निरोप समारंभात तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणे सादर केले. यावेळी त्यांच्यासमोर उपस्थित कर्मचाऱ्यांना मैत्रीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यांचे वर्तन शासकीय पदाच्या मर्यादेला आणि प्रतिष्ठेला धक्का लावणारे ठरले.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी याला गंभीर बाब ठरवत थोरात यांना तत्काळ निलंबित केले. त्यांनी स्पष्ट केले की, “शासकीय व्यासपीठावर अधिकाऱ्यांनी पदाची गरिमा, वेळ, आणि संदर्भ यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली, तरी शासकीय कार्यालयात मर्यादा पाळणे अपेक्षित आहे.” बावनकुळे यांनी इतर अधिकाऱ्यांनाही आपल्या वर्तनातून पदाची प्रतिष्ठा जपण्याचा इशारा दिला.
उमरी, जि. नांदेड येथून रेणापूर, जि. लातूर येथे बदली झालेले तहसीलदार श्री. प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून गाणे सादर केले. सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये… pic.twitter.com/XjGkrBYn6E
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 17, 2025
DYSP अनंत कुलकर्णी यांच्यावर कारवाई कधी?
15 ऑगस्ट 2025 रोजी जालना येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी आंदोलक अमित चौधरी यांच्या कमरेत “फिल्मी स्टाईल”ने लाथ मारली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला, ज्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आमदार रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत म्हटले, “खून, बलात्कार, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला लाथ मारणे एकवेळ समजण्यासारखे आहे, पण उपोषणकर्त्याला लाथ मारणे हा विकृतीचा कळस आहे. सरकारने या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी.
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनीही या घटनेचा निषेध करत पोलिसांच्या एकूणच वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “अंधाऱ्या कोठडीत पोलिसांची मारहाण आणि अत्याचाराची चर्चा कधी होणार? जालना येथील DYSP चा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाईची शक्यता आहे, पण यापूर्वी अनेकांना झालेल्या मारहाणीचा हिसाब कोण देणार? दरम्यान, महसूलमंत्री बावनकुळे यांना या प्रकरणाबाबत विचारले असता, त्यांनी “मी माहिती घेऊन कारवाई करतो,” असे आश्वासन दिले.


