Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. विशेषतः सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.
हा अधिकारी शिंदेंचा ‘शार्पशूटर’ असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “साताऱ्यातील ड्रग्स प्रकरण काय आहे, हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. फडणवीसांनी ड्रग्स कारखान्याला अभय दिले आहे. मुंबई पोलिस दलातील हा माजी अधिकारी शिंदेंचा जवळचा आहे.” त्यांनी फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात ‘नशेखोर राजकारण’ वाढत असल्याचेही म्हटले असून, या प्रकरणातील पैसा राजकारणात वापरला जात असल्याचा दावा केला.
अभिषेक घोसाळकर प्रकरणावर टीका
राऊत यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतरही टीका केली. ते म्हणाले, “ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी निष्ठावंत शिवसैनिक अभिषेक घोसाळकर यांचा फोटो प्रचारात वापरू नये. त्यांनी अमित शाह आणि भाजप नेत्यांचे फोटो लावावेत. अभिषेक हे निष्ठावंत शिवसैनिक होते आणि त्यांनी बलिदान दिले.” घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी मॉरिस नोरोन्हा याचा शिंदेंसोबतचा फोटो राऊत यांनी शेअर केला होता, ज्यामुळे राजकीय वाद वाढला आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीचा प्रश्न कौटुंबिक : संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत राऊत म्हणाले, “पुण्यातील राष्ट्रवादीचा प्रश्न कौटुंबिक आहे, मी त्यात बोलणार नाही. शरद पवारांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि ते जातीयवादी-धर्मांध शक्तींविरोधात लढत आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
दोन पवार (शरद आणि अजित) एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील तर आमचा पूर्ण पाठिंबा असेल.” मात्र, ते स्पष्ट म्हणाले, “अजित पवारांना मुंबईत आमच्या सोबत घेणार नाही. NCP(SP) ने अजित पवारांच्या NCP सोबत हातमिळवणी केली तर ते भाजपसोबत जाण्यासारखे असेल.” पुणे महापालिका निवडणुकीत NCP(SP) सोबत येण्याबाबत ते सकारात्मक असले तरी पक्षीय तत्त्वांवर ठाम आहेत.


