Rashtriya Bal Puraskar 2025 : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आणि आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना थक्क करणारा बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला मानाच्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात वैभवला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विजय हजारे करंडक स्पर्धेत बिहारकडून खेळणाऱ्या वैभवने नुकतीच अरुणाचल प्रदेशविरुद्ध ८४ चेंडूत १९० धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १५ उत्तुंग षटकार ठोकले होते. मात्र, मणिपूरविरुद्धच्या पुढील सामन्यात तो खेळू शकला नाही. याचे कारण म्हणजे, त्याच वेळी त्याला राष्ट्रीय बाल पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला उपस्थित राहायचे होते. क्रीडा क्षेत्रातील त्याच्या अतुलनीय योगदानासाठी केंद्र सरकारने त्याची या पुरस्कारासाठी निवड केली होती.
आयपीएलमधील ‘क्रेझ’ आणि आंतरराष्ट्रीय कामगिरी
वैभव सूर्यवंशीने केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्येच नव्हे, तर आयपीएलमध्येही आपली छाप सोडली आहे. वैभव आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला कायम (Retain) ठेवले आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याने ७ सामन्यांत २५२ धावा कुटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील (Under-19) भारतीय संघातून खेळताना त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
राष्ट्रपतींकडून कौतुक
या सोहळ्यात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, तुमच्यासारख्या मुलांनी क्रीडा, शौर्य, कला आणि विज्ञानासारख्या विविध क्षेत्रांत आपली विलक्षण प्रतिभा सिद्ध केली आहे. आज सन्मानित होणारे प्रत्येक मूल देशासाठी प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार सोहळा ‘वीर बाल दिना’च्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंह यांच्या साहिबजाद्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून घोषित केला आहे. याच काळात देशातील प्रतिभावान बालकांचा गौरव करण्याची परंपरा जोपासली जात आहे.


