Vijay Hazare Trophy 2025: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आज एका नव्या इतिहासाची नोंद झाली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारच्या फलंदाजांनी अरुणाचल प्रदेशविरुद्ध अक्षरशः ‘व्हिडिओ गेम’ सारखी फटकेबाजी करत अनेक जागतिक विक्रम मोडीत काढले. बिहारने 50 षटकांत 6 गडी गमावून 574 धावांचा डोंगर उभा केला, जो ‘लिस्ट-A’ क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
तामिळनाडूचा विक्रम मोडीत
बिहारने आज तामिळनाडूचा 506/2 (2022) धावांचा जुना विक्रम मागे टाकत जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. संपूर्ण डावात बिहारच्या फलंदाजांनी 11.48 च्या सरासरीने धावा कुटल्या. या ऐतिहासिक डावाचे मुख्य शिलेदार ठरले ते म्हणजे 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार साकिबुल गणी.
१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा जागतिक विक्रम
या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरला तो म्हणजे केवळ 14 वर्षे 272 दिवस वय असलेला वैभव सूर्यवंशी. त्याने अवघ्या 59 चेंडूत 150 धावा पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा (64 चेंडू) जागतिक विक्रम मोडीत काढला. वैभव आता पुरुष लिस्ट-A क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर बनला असून त्याने 84 चेंडूत 190 धावांची खेळी केली. यात त्याने 15 षटकार खेचून भारतीयाकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रमही नावावर केला.
हेही वाचा – ना विराट, ना रोहित…चर्चा फक्त 14 वर्षांच्या वैभवची! 36 चेंडूत शतक, 84 चेंडूत केल्या 190 धावा
एकाच दिवशी ३ वेळा मोडला ‘वेगवान शतकाचा’ रेकॉर्ड
आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अभूतपूर्व ठरला, कारण भारतातील सर्वात वेगवान लिस्ट-A शतक हा मान एकाच दिवशी तीन वेळा बदलला:
- वैभव सूर्यवंशी (बिहार): 36 चेंडूत शतक ठोकून पहिला विक्रम केला.
- इशान किशन (झारखंड): दुसऱ्या सामन्यात 33 चेंडूत शतक करून वैभवचा रेकॉर्ड मोडला.
- साकिबुल गणी (बिहार): अखेर बिहारच्या कर्णधाराने अवघ्या 32 चेंडूत शतक झळकावून नवा इतिहास रचला
जगातील तिसरे वेगवान शतक
साकिबुल गणीचे 32 चेंडूंतील शतक हे आता जगातील तिसरे सर्वात वेगवान लिस्ट-A शतक ठरले आहे. त्याच्यापुढे केवळ जॅक फ्रेझर-मॅकगर्क (29 चेंडू) आणि एबी डिव्हिलियर्स (31 चेंडू) आहेत. बिहारच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.


