Vijay Wadettiwar : मुंबईवर सध्या चौफेर आक्रमण सुरू असून, शहराची जमीन हडपून ती गुजरातच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईचे अस्तित्व आणि मराठी अस्मिता वाचवण्यासाठी आता एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.
ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा, पण…
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, दोन भाऊ आणि एक कुटुंब पुन्हा एकत्र येत असेल, तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या गणितावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षासोबत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची होती. मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसची कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
‘मविआ’ किंवा ‘इंडिया’ आघाडीला धक्का नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याच्या चर्चांवर वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले. लोकसभा आणि विधानसभेच्या आघाड्या वेगळ्या असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या पातळीवर लढल्या जातात. तिथे स्थानिक गणिते महत्त्वाची असतात. त्यामुळे मित्रपक्ष वेगवेगळे लढले तरी त्याचा ‘इंडिया’ आघाडी किंवा ‘महाविकास आघाडी’च्या एकजुटीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संविधान आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक
काँग्रेसच्या विचारधारेचा पुनरुच्चार करताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष जात किंवा धर्माचे राजकारण करत नाही. आम्ही केवळ संविधान आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. मुंबईतील लूट थांबवण्यासाठी आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील.


