Mumbai high court News : कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचा निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालय ने स्पष्ट भूमिका मांडली आहे. महिला सहकाऱ्याकडे एकटक पाहणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असले तरी ते ‘व्हॉय्युरिझम’ (चोरून पाहणे) या गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
एका विमा कंपनीतील महिला कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यावर गंभीर आरोप करत, तो सतत तिच्या शरीराकडे वाईट नजरेने पाहतो आणि अपमानास्पद वर्तन करतो, अशी तक्रार केली होती. हे प्रकरण अखेर हायकोर्टापर्यंत पोहोचले.
या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी सांगितले की, “महिलेकडे एकटक पाहणे हे निश्चितच अयोग्य आणि असभ्य वर्तन आहे. मात्र कायद्याच्या दृष्टीने ते व्हॉय्युरिझममध्ये बसत नाही.”
यापूर्वी कंपनीच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीने (ICC) या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्याला क्लीन चिट दिली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354C अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्पष्ट केले की, नैतिकता आणि कायदा यामध्ये फरक असतो. संबंधित कृत्य हे शिष्टाचाराच्या विरोधात असले तरी ते गुन्हा ठरत नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपीविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.


