CM Relief Fund : राज्यातील रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात येणार असून रुग्णांना मंत्रालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.
नवीन प्रणालीअंतर्गत रुग्णांनी स्वतः अर्ज करण्याऐवजी संबंधित रुग्णालयांनाच सर्व कागदपत्रे ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावी लागतील. यासाठी प्रत्येक रुग्णालयाला स्वतंत्र लॉगिन आणि पासवर्ड दिला जाणार आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अर्ज अपलोड झाल्यानंतर अवघ्या 3 ते 8 तासांत मदतीचा निर्णय रुग्णालय आणि नातेवाईकांना कळवला जाणार आहे. जर कागदपत्रे उशिरा सादर झाली, तर पुढील कामकाजाच्या दिवशी निर्णय दिला जाईल.
मदतीच्या रकमेतही बदल करण्यात आला असून, मंजूर रकमेपैकी 30 टक्के रक्कम सुरुवातीला दिली जाईल, तर उर्वरित रक्कम रुग्णाला डिस्चार्ज मिळताना देण्यात येणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या डिजिटल प्रणालीचा लवकरच शुभारंभ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 2025 मध्ये या निधीतून 40 हजारांहून अधिक रुग्णांना 333 कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. आता CSRच्या माध्यमातून ही मदत आणखी वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
तसेच कॅन्सरग्रस्त मुलांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि भारत पेट्रोलियम यांच्यासोबत त्रिपक्षीय करार करण्यात आला असून, या मुलांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नवीन ऑनलाइन पोर्टल 7 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात आले असून, यापुढे सर्व अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मदत मिळणार आहे.


