Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा महायुतीत श्रेयवाद उफाळून आला आहे. या योजनेचे श्रेय फक्त एकनाथ शिंदे यांनाच जाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याचे श्रेय घेऊ नये, असे स्पष्ट वक्तव्य शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या एका सभेत ते बोलत होते.
भरत गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लाडकी बहीण योजना सुरू झाली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करून, स्वतः मध्यप्रदेशात जाऊन शिंदेंनी या योजनेची माहिती घेतली आणि महाराष्ट्रात ती राबवली. त्यामुळे या योजनेचे सर्व श्रेय शिंदेंनाच जाते.
ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अनेक वर्षे सत्तेत होते, मात्र त्यांनी लाडक्या बहिणींसाठी अशी योजना का राबवली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लाडक्या बहिणींनाही ही वस्तुस्थिती माहित आहे, त्यामुळे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही गोगावले यांनी ठामपणे सांगितले.


