Ladki Bahin Yojana KYC : महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेत सर्व्हर डाउन, ओटीपी न येणे यासारख्या अडचणींमुळे अनेक महिलांना त्रास होत आहे. आता महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला असून, अंगणवाडी सेविका स्वतः लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
ई-केवायसीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. अद्याप लाखो महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर वेळेत केवायसी केले नाही, तर योजनेचा मासिक ₹१५०० चा लाभ बंद होऊ शकतो. बोगस लाभार्थ्यांना रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविकांची विशेष भूमिका
ऑनलाइन अडचणी येत असलेल्या महिलांसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन मदत करणार आहेत. याशिवाय, जवळच्या अंगणवाडी केंद्र, सेतु सुविधा केंद्र किंवा तहसील कार्यालयात जाऊनही ऑफलाइन केवायसी करता येईल.
चुकीची केवायसी सुधारण्याची शेवटची संधी
ई-केवायसीत काही चूक झाली असल्यास, लाभार्थ्यांना ती सुधारण्यासाठी एक अंतिम संधी देण्यात आली आहे. अधिकृत पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन ही दुरुस्ती ३१ डिसेंबरपर्यंत करता येईल. विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाले आहे, त्यांच्यासाठी पोर्टलवर विशेष पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


