मुंबई : राज्यभरात रविवारी घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नदी, कालवे आणि शेततळ्यांमध्ये उतरलेल्या अनेकांना जीव गमवावा लागला. पुणे, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांत घडलेल्या विविध घटनांमध्ये तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरात शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुंद्रूप गावाजवळील नाईक नगर तांड्यावर समर्थ मोहन चव्हाण (13) आणि ओंकार रमेश चव्हाण (12) या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. उष्णतेमुळे दोघेही पोहण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने शोध सुरू करण्यात आला. त्यावेळी दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.
उजनी कालव्यात दोन कारागीर वाहून गेले
मोहोळ तालुक्यातील ढोकबाबुळगाव येथे उजनीच्या डाव्या कालव्यात राजस्थानमधील श्रीकांत चोपडा आणि रविकांत चोपडा या दोन कारागिरांचा बुडून मृत्यू झाला. कालवा पाहताना एकजण पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात नदी आणि डॅममध्ये तिघांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मुलखेड परिसरात मुळा नदीत बुडून पंकज नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तो मित्रांसोबत नदीकाठी गेला होता. पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक बुडाला.
याशिवाय मावळ तालुक्यातील शिरोटा डॅममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनांमुळे पुणे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
लातूरमध्ये चेंडू काढताना दोन चिमुकल्यांचा मृत्यू
लातूर शहरातील बोधे नगर परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. दिव्या उबाळे (6) आणि कार्तिक कांबळे (7) हे दोन चिमुरडे खेळताना चेंडू काढण्यासाठी पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात उतरले आणि बुडाले.
हा खड्डा टँकर व्यवसायासाठी खोदण्यात आला होता. मात्र सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
राज्यात हळहळ; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नदी, कालवे आणि शेततळ्यांमध्ये उतरताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रविवारी घडलेल्या या घटनांमुळे राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे.


