मुंबई: मुंबई विमानतळावर 12 सप्टेंबर रोजी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. गुजरातच्या कांडला विमानतळावरून मुंबईकडे निघालेल्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाच्या उड्डाणानंतर धावपट्टीवर त्याचे बाह्य चाक आढळून आल्याने प्रवाशांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर तातडीने विमानतळ प्रशासनाला सावध करण्यात आले. तथापी, विमानाने आपला प्रवास सुरू ठेवला. त्यानंतर विमानाने मुंबईत सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. विमानाने स्वतःच्या शक्तीने टर्मिनल गाठले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवासी सुखरूप उतरले. एअरलाइनच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.
दरम्यान, विमानवाहतुकीतील बिघाडांच्या मालिकेत आणखी एक घटना दिल्ली विमानतळावर घडली. सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI2380 या फ्लाइटमध्ये एअर कंडिशनिंग सिस्टम आणि वीज पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बोईंग 787-9 ड्रीमलाइनर विमान बुधवारी रात्री 11 वाजता दिल्लीहून उड्डाण करणार होते, मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रवास उशिरा सुरू झाला.
प्रवाशांनी सांगितले की, दोन तास विमानात बसवून ठेवलेल्यानंतर अखेर सर्व 200 हून अधिक प्रवाशांना विमानातून उतरवून टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले. प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली असली तरी, एअरलाइनने त्वरित प्रवाशांना अल्पोपहार आणि जेवणाची सोय केली. एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी करून कळवले की, प्रस्थानापूर्वी कूलिंग सिस्टीममध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाला. मात्र सर्व प्रवाशांना वेळोवेळी माहिती दिली जात होती आणि आवश्यक मदत पुरवली गेली.
दरम्यान, शेवटी विमान बदलण्यात आले आणि 13 सप्टेंबरच्या पहाटे 5:36 वाजता फ्लाइटने सिंगापूरकडे सुरक्षित उड्डाण केले. या घटनांमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून, विमान कंपन्यांनी सुरक्षेच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.


