मुंबई/बीड : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा देत, “आम्हाला आझाद मैदानातून हाकलवलं तर गरीब मराठ्यांच्या मनात बदला घेण्याची चीड निर्माण होईल,” असं म्हटलं आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ५ लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या प्रकरणांचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे आंदोलकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बीडमधील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया
बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास आणि त्यांची मागणी मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना ८ दिवसांत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात मराठा आरक्षणाशी संबंधित सुमारे ४०० प्रकरणं प्रलंबित आहेत, आणि ही सर्व प्रकरणं पुढील २० दिवसांत तपासून अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या आंदोलनांमुळे ५ लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालं, अशा प्रकरणांचे गुन्हे मागे घेण्यावर भर आहे. यामुळे बीडमधील अनेक मराठा आंदोलकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तथापि, ज्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान किंवा हिंसक घटना घडल्या, त्यांचा तपास कायम राहण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांच्या मागण्या काय?
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केलं असून, मराठा समाजाला ओबीसी कोट्याअंतर्गत १०% आरक्षण आणि हैदराबाद, सातारा, औंध आणि मुंबई गॅझेटनुसार मराठ्यांना कुनबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सरकारला हैदराबाद आणि सातारा गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करून कुनबी प्रमाणपत्र वितरण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. “हैदराबाद आणि सातारा गॅझेट एका तासात लागू करता येतात, मग विलंब का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जरांगे यांनी १ सप्टेंबरपासून पाणी पिणंही बंद केलं होतं, परंतु सोमवारी रात्री त्यांनी काही घोट पाणी घेतलं. त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढत असताना, जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तरीही, “मी मरेपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही,” असं त्यांनी ठणकावलं आहे.
मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस
मनोज जरांगे यांचे आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे आज (2 सप्टेंबर) काही पोलीस अधिकारी स्वत: ही नोटीस घेऊन आझाद मैदानात आले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना झोपेतून जागे करत ही नोटीस त्यांच्या हातात ठेवली. त्यामुळे आता मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


