मुंबई: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील काही अर्जाची फेरछाननी होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली. ज्या लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे, ज्यांच्याकडे कार, नोकरी आहे, अशा महिलांना आता या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो. यामुळे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार ‘प्राप्त झाली, तर तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकषबाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. वेगवेगळ्या अँगलने आम्ही या तक्रारींची पडताळणी करणार आहोत. काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी होणार आहे. मात्र मूळ जीआरमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
“तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखांच्या वर उत्पन्न गेले असेल, तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत. चार चाकी वाहन असलेल्या महिला अपात्र ठरतील; आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत; आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरले. 12 लाख 87 हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते. त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन कोटी 34 लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबरपर्यंतचे प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते. डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली.
12 लाखांवर नवे लाभार्थी
आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या 12 लाख 87 हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले.
‘या’ अर्जाची होणार पडताळणी
1) अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांच्या अर्जाची होणार छाननी
2) चार चाकी वाहने असलेल्या महिलांच्या अर्जाची होणार पडताळणी
3) एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले असल्यास अशा अर्जाचीही तपासणी
4) विवाहानंतर महाराष्ट्रातून इतर राज्यांत स्थलांतरित झालेल्या महिलांच्या अर्जाची होणार पडताळणी
5) आधार कार्ड आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावरील नावांमध्ये तफावत असलेल्या महिलांच्या अर्जाचीही तपासणी होणार आहे


