मुंबई : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन आणि जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५ च्या अटींचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जरांगे आणि त्यांच्या कोर कमिटी सदस्यांना आझाद मैदान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले असून, पुढील आंदोलनाची परवानगीही नाकारली आहे.
नोटीसमध्ये काय आहे?
मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या कोर कमिटीतील आठ सदस्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये किशोर मरकड, पांडुरंग तारक, शैलेंद्र मरकड, सुदाम मुकणे, बाळासाहेब इंगळे, अॅड. अमोल लहाणे, श्रीराम कुरणकर आणि संजय कटारे यांचा समावेश आहे. नोटीसमध्ये खालील प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख आहे:
1. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन : २६ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ (अॅमी फॉऊंडेशन वि. महाराष्ट्र राज्य) मध्ये स्पष्ट आदेश दिले होते की, जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदोलन करू नये. तसेच, आंदोलनासाठी अर्ज करणे आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. याशिवाय, खारघर, नवी मुंबई येथे पर्यायी जागेचा विचार करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.
2. आंदोलनाची परवानगी : २७ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांनी जरांगे यांना २९ ऑगस्टला सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आझाद मैदानात एकदिवसीय आंदोलनाची परवानगी दिली होती. मात्र, जरांगे यांनी ही परवानगी संपल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवले. यामुळे नियमांचा भंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
3. वाहतूक आणि जनजीवनात अडथळा : आंदोलनादरम्यान सुमारे ४०,००० आंदोलक आणि ११,००० वाहने मुंबईत दाखल झाली. यापैकी ५,००० वाहने दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये बेकायदा पार्क करण्यात आली. यामुळे महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नवरोजी मार्ग, महापालिका मार्ग आणि हजारीमल सोमाणी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. याचा परिणाम उच्च न्यायालय, सत्र न्यायालय, मंत्रालय, रेल्वे स्थानके आणि रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक ठिकाणांवर जाणाऱ्या नागरिकांना झाला.
4. सार्वजनिक आरोग्याला धोका : आंदोलकांनी रस्त्यांवर अन्न शिजवणे, उघड्यावर स्नान करणे, शौचास बसणे आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. यामुळे सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याला बाधा निर्माण झाली.
5. आत्मदहनाचा प्रयत्न आणि उपोषण : नियम क्र. १० (ड) नुसार आंदोलनात आत्मदहन, आत्महत्येचा प्रयत्न किंवा उपोषणास मनाई आहे. मात्र, जरांगे यांनी स्वतः २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले. याशिवाय, आंदोलक तानाजी पाटील यांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, ज्यामुळे नियमांचा गंभीर भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांचा इशारा
नोटीसमध्ये मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना तात्काळ आझाद मैदान रिकामे करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या अमित साहनी प्रकरणातील निर्देशांचा उल्लेख करत, आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, असे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी जरांगे यांना नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.


