मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. रविवारी (१ सप्टेंबर २०२५) संध्याकाळी जुहू बस स्थानकात मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी आणि बेस्ट बसच्या तोडफोडीची घटना घडली.
या प्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात मराठा आंदोलकांविरोधात पहिला गुन्हा दाखल केला आहे. मराठा आंदोलनाच्या चार दिवसांनंतर मुंबईत नोंदवला गेलेला हा पहिला गुन्हा आहे. यामुळे आंदोलनाच्या शांततापूर्ण स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी संध्याकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास जुहू बस स्थानकात बेस्टच्या २०१ क्रमांकाच्या बस रस्त्यावर कर्मचारी नसताना थांबलेली होती. यावेळी मराठा आंदोलक आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आंदोलकांनी एका प्रवाशाला बसच्या आत खेचून मारहाण केली आणि बसच्या उजव्या बाजूच्या तिसऱ्या खिडकीची काच फोडली. या घटनेचा ५९ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आणि मार्शल्सनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक आक्रमक राहिले. अखेरीस आपत्कालीन हेल्पलाइन (१००) वर संपर्क साधण्यात आला. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आंदोलक आणि संबंधित प्रवासी पळून गेले. क्षतिग्रस्त बस सेवेतून काढून घेण्यात आली, आणि प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. जुहू पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांना शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
आंदोलनाचा हिंसक चेहरा
ही घटना मराठा आंदोलनादरम्यान मुंबईत घडलेली पहिली हिंसक घटना आहे. याशिवाय, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मुंबई लोकल ट्रेनमध्ये मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसते. या घटनांनी आंदोलनाच्या शांततापूर्ण स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आंदोलकांनी आझाद मैदानाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक, मंत्रालय आणि इतर परिसरातही गर्दी केली होती. सुमारे ४०,००० आंदोलक आणि ११,००० वाहनांनी दक्षिण मुंबईतील रस्ते व्यापले, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना रुग्णालये, कार्यालये आणि रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले.
“जरांगे पाटील हेच आमचं कोर्ट” , आंदोलकांचा संताप
उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आम्हाला आझाद मैदानात चिखलात बसायचं आहे का? सुविधा नसताना आम्ही कुठे जाणार? आमच्यासाठी फक्त मनोज जरांगे पाटील हेच कोर्ट आहेत. ते सांगतील तेव्हा आम्ही मुंबई खाली करू,” असे आंदोलकांनी म्हटले आहे. आंदोलकांनी तक्रार केली की, पोलिसांनी त्यांच्या गाड्या रस्त्यावरून हटवल्या, पण पार्किंगची व्यवस्था लांब आहे आणि सिमेंटच्या गोडाऊनसारख्या ठिकाणी राहण्याची सोय नाही.


