मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचाराचा जोर वाढवत मुंबईतील विविध भागांतील शाखांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी राज ठाकरे थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून, महायुतीवर तीव्र शब्दांत टीका करत आहेत.
आज राज ठाकरे यांनी लालबाग, परेल आणि वडाळा परिसरातील मनसे व शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून राज ठाकरेंनी निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले. “इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळायचं आहे,” असं आवाहन करत त्यांनी महायुतीवर थेट घणाघात केला.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची नसून मुंबईच्या भवितव्यासाठी निर्णायक आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेने ताकदीने मैदानात उतरून ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांसाठी काम करावे, असं आवाहन त्यांनी केलं.
यासोबतच उद्या शिवतीर्थावर होणाऱ्या संयुक्त सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत, “शिवतीर्थावर शक्ती प्रदर्शन करून विरोधकांना आपली ताकद दाखवून द्या,” असा संदेशही राज ठाकरे यांनी दिला. आगामी निवडणुकीत मुंबईत ठाकरे गट आणि मनसेची ताकद वाढवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.


