मुंबई : शालेय विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाने येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी संपाचा इशारा दिला असून, त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणावर बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यातील महामंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार आहेत. मागण्या सोडवल्या नाहीत तर संपाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही देण्यात आला.
संपाचे मुख्य कारण कारण काय?
महामंडळाने शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. TET २०२५ च्या पार्श्वभूमीवर ही मागणी अधिक तीव्र झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) TET २०२५ ची परीक्षा २३ नोव्हेंबरला घेतली असून, उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात मोठा असंतोष आहे. TET पास न केल्यास नोकरी धोक्यात येईल, असा भयावह परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रमुख मागण्या काय?
- TET अनिवार्यता रद्द : २०१३ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक करू नये. हा निर्णय रद्द करावा.
- संचमान्यता निकष बदल : १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषांनुसार शाळा संचमान्यता द्यावी.
- शिक्षणसेवक योजना बंद : ही योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी आणि सेवा हक्क लागू करावेत.
या मागण्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने, महामंडळाने मोर्च्यांद्वारे दबाव वाढवण्याचा निर्णय घेतला. सरकारने तात्काळ चर्चा न केल्यास शाळा सुट्टीचा शासन निर्णय काढावा, अशी मागणीही केली आहे.
विद्यार्थी व पालकांसाठी काय परिणाम?
संपामुळे शाळांमध्ये शिक्षक उपस्थित राहणार नसल्याने वर्ग रद्द होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मोर्च्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. अद्याप शासनाने शाळा बंदीचा अधिकृत आदेश दिला नसला तरी, पालकांनी स्थानिक शाळांशी संपर्क साधावा. पूर्वीच्या आंदोलनांप्रमाणे (जसे जुलै २०२५ मधील संप) यावेळीही TET मुद्दा केंद्रस्थानी आहे.


