मुंबई : महाराष्ट्रातील महायुतीत खळबळ उडवणारा नवा टप्पा सुरू झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेला कमालीचा धक्का देत ‘मॅन टू मॅन मार्किंग’चा रणनीती अवलंबली आहे. शिंदे सेनेच्या प्रत्येक दिग्गज नेत्याला-आमदाराला विधानसभा निवडणुकीत आव्हान देणाऱ्या व्यक्तींना भाजपने अचूक हेरून पक्षात घेतले आहे.
यामुळे प्रचंड नाराज झालेल्या शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी मंगळवारी (१८ नोव्हेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. नंतर शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्या बैठकीत फडणवीसांनी शिंदे गटाला थेट सुनावले, “फोडाफोडीची सुरुवात तुम्हीच २०२२ मध्ये केली होती, तेव्हा मला विचारलं होतं का?” शेवटी दोन्ही पक्षांमध्ये तह झाला की, पुढे एकमेकांच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही. पण हा तह किती दिवस टिकेल, यावर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा जोरदार हल्ला
शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपने शिंदे सेनेच्या ६ पैकी प्रत्येक आमदाराला लक्ष्य करत त्यांचे विरोधक पक्षात घेतले आहेत:
- अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध → सुरेश बनकर (माजी उद्धव गट, आता भाजपमध्ये)
- रमेश बोरणारे (वैजापूर) यांच्याविरुद्ध → दिनेश परदेशी (मूळ भाजप, नंतर उद्धव गटात गेले, आता पुन्हा भाजपमध्ये)
- संजय शिरसाट (पालकमंत्री) यांच्याविरुद्ध → राजू शिंदे (मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश)
- शिंदे गटाचे जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत यांनाही भाजपने घेतले
- महिला जिल्हाप्रमुख शिल्पा वाडकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला, लवकरच भाजपमध्ये दिसणार
कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना अप्रत्यक्ष शह
एकनाथ शिंदे यांची कर्मभूमी आणि पुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही भाजपने मोठा डाव खेळला. दिवंगत शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे आणि सून अश्विनी म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मंगळवारी भाजपमध्ये दाखल. एकूण १७ हून अधिक माजी शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
फडणवीसांचा थेट सवाल, शिंदेंची नाराजी
शिंदे गटाच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे तक्रार केली की, “भाजप आमच्या नेत्यांना फोडून आगामी निवडणुकीत आमच्याविरुद्ध नवीन नेतृत्व तयार करत आहे.” त्यावर फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सुनावले, २०२२ मध्ये तुम्हीच शिवसेना फोडली होती, तेव्हा मला कोणी विचारलं होतं का? आता आम्ही करतोय म्हणून ओरडा?” अखेर दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला की, पुढील काळात एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देणार नाही. मात्र या तहानंतरही भाजपचे प्रवेश थांबले नाहीत, ही बाब शिंदे गटाला खटकत आहे.


