BMC Election 2026: राज्यभरात महापालिका निवडणुकींचा धुराळा सुरु असताना काही अप्रिय घटना देखील घडताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारावर अज्ञात इसमाकडून जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या वांद्र्यात शिंदेंच्या शिवसेना उमेदवारावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मुंबईतत वॉर्ड क्रमांक 92 मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 92 चे उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. एका अज्ञात इसमाने हाजी सालिन कुरेशी यांच्या पोटात चाकू भोसकल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरात घडली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी हाजी सालिन कुरेशी यांना तातडीने रुग्णालयात नेले. त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
हाजी कुरेशी जिथे निवडणूक लढवत आहेत त्या 92 प्रभागामध्ये 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून हाजी कुरेशी उमेदवार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अरुण कांबळे उमेदवार आहेत. काँग्रेसकडून इब्राहिम कुरेशी हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून युसूफ माडी, समाजवादी पार्टीचे शबाना वकील खान हे उमेदवार आहेत.


