Neela Desai death : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर जावे लागल्यानंतर काही तासांतच शिवसेनेवर आणखी एक मोठा आघात झाला आहे. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू नेत्या नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीला देसाई यांना शुक्रवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नीला देसाई या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जात होत्या. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अत्यंत आक्रमकपणे काम करत पक्षाची पाळेमुळे मुंबईत घट्ट केली. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांच्या निधनाने जुने शिवसैनिक हळहळ व्यक्त करत आहेत.
१९९० साली मुंबईतील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून नीला देसाई शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. महिलांना संघटित करणे, महिला आघाडी मजबूत करणे आणि मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी विधानसभेत ठामपणे आवाज उठवणे, यासाठी त्या ओळखल्या जात होत्या.
मुंबईत शिवसेनेची सत्ता गेल्याच्या धक्क्यानंतर त्याच रात्री नीला देसाई यांचे निधन झाल्याने हा दुहेरी आघात असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.


