मुंबई: निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. नगर पंचायत आणि नगर परिषदेसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान अद्याप महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. येत्या काही काळात राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा देखील होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना मुंबई महापालिकेसाठी आमची शंभर जागा लढवण्याची तयारी आहे, असं मोठं वक्तव्य देखील सुर्वे यांनी यावेळी केलं आहे.
दरम्यान, काल शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी होणार होती. मात्र कोर्टाने पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो. गेल्या ३ वर्षापासून कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कोर्टाचा निकाल यावा यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू होते. मात्र आता या खटल्याची अंतिम सुनावणी थेट पुढच्या वर्षीच होणार आहे. येत्या 21 जानेवरी 2026 रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी घेतली जाईल.


