Uddhav Thackeray: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या विजयोत्सवावर टीकेची झोड उठवली आहे. ‘सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक लोकशाही पायदळी तुडवून, साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून लढवली. आमचा आकडा कदाचित कमी असेल, पण आमच्या पराजयालाही एक तेज आहे, तर तुमचा विजय हा भ्रष्टाचाराने डागाळलेला आहे. कागदावरची शिवसेना नव्हे, जमिनीवरची शिवसेना संपवून दाखवा,’ असं आव्हान यावेळी ठाकरेंनी भाजपला आणि शिंदे गटाला दिलं.
‘खुर्च्यांनी मतदान केलं का?’ सभेतील गर्दीवरून टोला
निवडणूक निकालातील गणितावर शंका उपस्थित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या सभेला झालेली विराट गर्दी आणि दुसऱ्या दिवशी महायुतीच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या यांचे गणित जुळत नाही. “जर तुमच्या सभांना माणसं नव्हती, तर मग तुम्हाला मतदान काय रिकाम्या खुर्च्यांनी केलं का?” असा खोचक सवाल त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला.
पैशांचा पाऊस आणि यंत्रणेचा गैरवापर
निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकारांवर बोट ठेवत ठाकरेंनी गंभीर आरोप केले. गेल्या ४ वर्षांत विकासनिधीच्या नावाखाली आमदारांना आणि नगरसेवकांना अमाप पैसा वाटण्यात आला. निवडणुकीच्या काळात साड्या आणि मिक्सरचे वाटप करून मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला. हा हजारो कोटींचा पैसा येतो कुठून? या पैशांच्या स्त्रोताची चौकशी करण्यासाठी ईडी, सीबीआय किंवा आयकर विभाग सत्ताधाऱ्यांच्या मागे का लागत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मोदींच्या नोटाबंदीच्या अपयशावरही त्यांनी टीका केली.
‘कागदावरची शिवसेना नव्हे, जमिनीवरची शिवसेना महत्त्वाची’
भाजपने पक्ष फोडून कागदावर शिवसेना संपवल्याचा दावा केला असला तरी, जमिनीवर शिवसेना आजही भक्कम असल्याचे ठाकरेंनी ठणकावून सांगितले. ज्यांनी छळवणूक, तडीपारीच्या नोटिसा आणि पैशांच्या आमिषाला बळी न पडता ‘शिवशक्ती’ला साथ दिली, तेच खरे लोकशाहीचे रक्षक आहेत. भाजप जमिनीवर असता, तर त्यांना आमचे नगरसेवक फोडावे लागले नसते,’ असेही ते म्हणाले.


