PMC Election Winners List: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘एकहाती’ वर्चस्व गाजवत अभूतपूर्व यश मिळवले आहे. महापालिकेच्या रणांगणात १२५ जागांचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपने ११९ जागांवर विजय मिळवून विरोधकांचे अक्षरश: पानिपत केले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, काँग्रेस आणि मनसे यांसारख्या बलाढ्य शक्तींना या वादळात स्वतःला सावरता आले नाही. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम निकालांनुसार भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, तब्बल ११९ जागांसह त्यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला २७ जागा मिळवता आल्या असून, ते दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १५ जागांवर यश मिळवले आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ०३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अवघ्या ०१ जागेवर विजय मिळवता आला असून, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांचे खातेही उघडले नाही, म्हणजेच त्यांना शून्य जागा मिळाल्या आहेत.
मोठी उलथापालथ: ‘हे’ दिग्गज ठरले गपगार
या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का वसंत मोरे, रुपाली ठोंबरे-पाटील यांसारख्या आक्रमक चेहऱ्यांना बसला आहे. पुण्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे हे नेते यावेळी मतदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले. भाजपने ‘विरोधी मतांचे विभाजन’ करण्याची आखलेली रणनीती यशस्वी ठरली, ज्यामुळे अनेक प्रभागांत तिरंगी लढतीचा फायदा भाजप उमेदवारांना झाला.
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी :
पुणे महापालिकेतील प्रत्येक प्रभागातील ‘A टू Z’ विजयी चेहरे खालीलप्रमाणे आहेत:
- प्रभाग १ ते ५ (धानोरी, कळस, लोहगाव, खराडी): या भागात भाजपचे वर्चस्व राहिले. अश्विनी भंडारे, संगीता दांगट, योगेश मुळीक आणि सुरेंद्र पठारे यांनी दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे आणि सुहास टिंगरे यांनी आपली जागा राखण्यात यश मिळवले.
- प्रभाग ६ (येरवडा): येथे काँग्रेसने बाजी मारली. अविनाश साळवे आणि विशाल मलके यांच्यासह संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
- प्रभाग ७ ते ११ (बाणेर, पाषाण, कोथरूड): कोथरूड आणि बाणेरमध्ये कमळ जोरात राहिले. हर्षल टिंगरे (राष्ट्रवादी) आणि सन्नी निम्हण (भाजप) यांनी आपापले गड राखले. रुपाली पवार (भाजप) यांनी प्रभाग १० मधून विजय मिळवला.
- प्रभाग १२ ते १५ (शिवाजीनगर, कसबा, हडपसर): निवेदिता एकबोटे आणि धीरज घाटे यांनी भाजपचा झेंडा फडकवला. अरविंद शिंदे यांनी काँग्रेससाठी कसबा परिसरातून संघर्ष कायम राखला.
- प्रभाग १६ ते २० (कोंढवा, बिबवेवाडी, वानवडी): वानवडीत प्रशांत जगताप (काँग्रेस) विजयी झाले. तर बिबवेवाडीत श्रीनाथ भिमाले आणि मानसी देशपांडे या भाजपच्या दिग्गजांनी वर्चस्व गाजवले. शरद पवार गटाचे अब्दुल गफूर पठाण यांनी प्रभाग १९ मधून विजय मिळवला.
- प्रभाग २१ ते २५ (पुणे स्टेशन, भवानी पेठ, शनिवार पेठ): भवानी पेठेत आंदेकर कुटुंबाने (सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर) राष्ट्रवादीकडून विजय मिळवला. गणेश बीडकर आणि कुणाल टिळक यांनी भाजपसाठी महत्त्वाच्या जागा जिंकल्या.
- प्रभाग ३० ते ३५ (वारजे, शिवणे, सिंहगड रोड): पृथ्वीराज सुतार, सायली वांजळे आणि सचिन दोडके यांनी भाजपच्या तिकीटावर विजय साकारला.
- प्रभाग ४० (कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी): येथे भाजपने सर्व जागा जिंकल्या असून रंजना टिळेकर आणि अर्चना जगताप यांनी मोठे यश मिळवले.


