Praphull Shivale:शिरूर तालुक्यातील वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्लदादा शिवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पाबळ–केंदूर परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत निर्णायक मानला जात असून, यामुळे विरोधकांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत, आमदार माऊली कटके यांच्या माध्यमातून झालेल्या या प्रवेशात सुचेता सनी थिटे यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रवेशाआधीच पाबळ–केंदूर गटासाठी प्रफुल्ल शिवले यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे मानले जात होते. त्यातच पाबळ गणासाठी वंदना प्रकाश पवार आणि केंदूर गणासाठी सुचेता सनी थिटे यांची नावे निश्चित मानली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या गटात मजबूत सामाजिक व राजकीय व्यूहरचना उभी केल्याचे दिसून येते.
दरम्यान केंदूर गणातील सुचेता सनी थिटे या केंदूरच्या माजी आदर्श सरपंच विमलताई रामभाऊ थिटे यांच्या स्नुषा असून सनी थिटे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे तालुकाध्यक्षपद भूषविले आहे. या शिवाय वंदना प्रकाश पवार यांचे पती शिरुर बाजार समितीचे माजी सभापती तर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत. या शिवाय पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ तथा कात्रज संघाच्या माजी अध्यक्षा व जेष्ठ संचालिका केशरताई पवार यांच्या जाऊबाई असून शिरुर तालुक्याच्या राजकारणावर या कुटुंबाचा गेले अनके वर्षे प्रभाव राहिलेला आहे. दरम्यान वरील पक्षप्रवेशावेळी केंदूरचे माजी सरपंच, शिरुर तालुक्यातील जेष्ठ उद्योगपती व माजी उपसभापती सविताताई प-हाड यांचे पती प्रमोदशेठ प-हाड हे उपस्थित होते.
ग्रामपातळीवरील कामातून नेतृत्वाची घडण
प्रफुल्ल शिवले यांचा प्रवास हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून, अत्यंत साध्या परिस्थितीतून उभा राहिलेल्या संघर्षाची कहाणी आहे. घड्याळ दुरुस्तीच्या छोट्या व्यवसायापासून सुरू झालेला प्रवास पुढे उद्योग, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक बांधिलकीपर्यंत पोहोचला. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी वढु बुद्रुकमध्ये पाणी, रस्ते, वीज, ग्रामस्वच्छता, प्रशासनातील पारदर्शकता अशा मूलभूत प्रश्नांवर ठोस काम केले. ‘यशस्वी, भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध’ अशी त्यांची प्रतिमा या काळात निर्माण झाली.
विकासकामांचा ठसा
छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ विकास, पर्यटनस्थळाचा दर्जा, पाबळ–केंदूर गटातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक वाहतूक, रोजगाराच्या संधी या प्रश्नांवर शिवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या कामांमुळे त्यांना केवळ वढु बुद्रुकच नव्हे तर संपूर्ण पाबळ–केंदूर गटात स्वीकारार्ह नेतृत्व म्हणून ओळख मिळाली.
राष्ट्रवादीला संघटनात्मक बळ
शिवले यांचा प्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ग्रामीण भागात मजबूत संघटन उभे करण्याची मोठी संधी मानली जात आहे. सामाजिक कार्य, उद्योग, प्रशासनाचा अनुभव आणि युवकांशी थेट संपर्क या बाबींचा लाभ राष्ट्रवादीला होणार असून, विरोधकांच्या मतपेढीला यामुळे मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत रंगणार चुरस
पाबळ–केंदूर गट हा नेहमीच चुरशीचा मानला जातो. मात्र शिवले–पवार–थिटे या त्रिसूत्रीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक समतोल, महिला प्रतिनिधित्व आणि स्थानिक नेतृत्व यांचा अचूक मेळ साधल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. एकूणच, आदर्श सरपंच ते संभाव्य जिल्हा परिषद सदस्य असा प्रफुल्ल शिवले यांचा प्रवास पाबळ–केंदूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार का, याकडे आता संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


