Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत अनेक मुद्द्यांवर टीका केली. दिल्लीत झालेल्या घडामोडींवर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासह इतर पक्षांवर निशाणा साधला. “हे पक्ष स्वतंत्र नसून भाजपची अंगवस्त्र आहेत आणि अमित शाह यांनी उभे केलेले आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे त्यांचे मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले.
राजकारणात सत्तेचा, पैशाचा आणि यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, “आमिष आणि दबाव टाकून राजकारण केलं जात आहे. मात्र हे जास्त काळ चालणार नाही.” दिल्लीच्या राजकीय इतिहासाचा दाखला देत त्यांनी “इथे आलेल्यांना कधीतरी परत जावंच लागतं,” असा टोला लगावला.
विरोधी पक्षाच्या आमदार-खासदारांना निधी दिला जात नसल्याचा गंभीर आरोप करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “हा पैसा कोणाच्या बापाचा नाही, तो महाराष्ट्राच्या जनतेचा आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, अहिल्यानगरमधील अल्पवयीन मुलीवरील अॅसिड हल्ल्याच्या घटनेवरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. “महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरले आहे,” असे म्हणत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
याचवेळी भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की, शुभकार्यांमध्ये राजकारण आणलं जात नाही. त्यामुळे ते लग्नाला गेले असतील,” असे ते म्हणाले.
तथापि, प्रसाद लाड यांनी पूर्वी शिवसेना भवन जाळण्याची भाषा केल्याची आठवण करून देत राऊत म्हणाले, “अशा गोष्टी माझ्यासारखा शिवसैनिक कधीच विसरू शकत नाही.”


