Police Bharti : राज्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी असून पोलिस भरती प्रक्रियेची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे. पुणे शहर पोलिस दलातील विविध पदांसाठी प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 1633 पदे भरली जाणार असून, त्यासाठी तब्बल 39 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
पुणे शहर पोलिस दलात पोलिस अंमलदार, वाहनचालक आणि पोलिस बँडसमन अशा पदांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, पोलिस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक दोनच्या मैदानावर मैदानी चाचण्या घेण्यात येणार आहेत.
भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीत उंची, छाती मोजमाप, 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे (महिलांसाठी 800 मीटर) आणि गोळाफेक यांचा समावेश आहे. ही चाचणी 100 गुणांची असून किमान 50 गुण मिळवणे आवश्यक आहे.
कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी RFID तंत्रज्ञान आणि CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उपस्थिती आणि धावण्याची वेळ अचूक नोंदवली जाणार आहे.


