मुंबई : महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करत निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी आधार असेल. प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल, त्यावर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर होईल. जिल्हा प्रशासनाने निवडणूक तयारीसाठी सूचना जारी केल्या असून, प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक तयारी जोरात सुरू आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादीत नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे किंवा पत्त्यांमध्ये बदल यासारख्या कार्यवाही या टप्प्यावर केल्या जाणार नाहीत. केवळ लेखनिकांच्या चुका, मतदाराचा निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण चुकणे, किंवा विधानसभा यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नाव नसणे यासारख्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. नागरिकांनी यादी तपासून mahasec.maharashtra.gov.in वर किंवा जिल्हा निवडणूक कार्यालयात फॉर्मसह हरकत नोंदवावी.
जिल्हानिहाय आरक्षण, महिलांना विशेष स्थान
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण पुढीलप्रमाणे :
ठाणे, सांगली, कोल्हापूर, अमरावती, लातूर, धाराशिव, गोंदिया, गडचिरोली: सर्वसाधारण (महिला)
पालघर, नंदुरबार, अहमदनगर, अकोला, वाशिम: अनुसूचित जमाती (महिला)
रायगड, नाशिक, जळगाव, यवतमाळ, छ. संभाजीनगर, बुलढाणा: सर्वसाधारण
रत्नागिरी, धुळे, सातारा, सोलापूर, जालना, नांदेड, नागपूर, भंडारा, हिंगोली: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
परभणी, वर्धा, चंद्रपूर: अनुसूचित जाती (महिला)
बीड: अनुसूचित जाती
निवडणूक कधी?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, मतदार यादीच्या प्रक्रियेनंतर लवकरच निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण भागातील नेतृत्व आणि विकासाच्या नव्या संधींची दारे उघडतील. नागरिकांनी मतदार यादी तपासून घ्यावी आणि हरकतींसाठी दिलेल्या कालावधीत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.


