Raj Thackeray Bihar Bhavan Mumbai: मुंबईतील बिहार भवनाला विरोध करणारे फालतू आणि विकृत मानसिकतेचे लोक आहेत. मुंबईत बिहार भवन उभारु देणार नाही, असे हे लोक म्हणतात. महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? या देशात कुठेही कोणाचीही जबरदस्ती चालणार नाही. मुंबईत कोणत्या राजाची राजवट आहे का, राज ठाकरे (Raj Thackeray) हे काय तिकडचे राजे लागून गेले आहेत का? आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन (Bihar Bhavan) उभारणारच, असे वक्तव्य बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी (Anil Choudhary) यांनी केले आहे.
मुंबईतील बिहार भवन हे एका भावनेतून उभारले जात आहे. बिहारमधून अनेक लोक कॅन्सर व अन्य रोगांच्या उपचारासाठी मुंबईत जातात. त्या लोकांच्या सोयीसाठी हे बिहार भवन बांधले जात आहे. अनेक राज्यांमध्ये बिहार भवन आहे. त्याप्रमाणे मुंबईतही बिहार भवन बांधले जाईल, असे अशोक चौधरी यांनी म्हटले. मुंबईतील बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर बिहार भवन बांधण्याची योजना आहे. मात्र, मनसेने बिहार भवनाला विरोध केला आहे. आता अशोक चौधरी यांच्या वक्तव्यानंतर हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
अशोक चौधरी यांच्या या टीकेला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चौधरी यांनी आधी आपले स्वत:चे राज्य सांभाळावे. दुसऱ्यांना अक्कल शिकवू नये. स्वत:ची राज्य नीट ठेवलीत तर तुमचे लोक बाहेर जाणार नाहीत. देशभरात बिहारबद्दल काय बोललं जातं, हे एकदा अशोक चौधरी यांनी जाणून घ्यावे. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. देवाने तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नये, असे अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले.
मुंबईत 30 मजली बिहार भवन, नितीश सरकारचा मोठा प्लॅन
दक्षिण मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 30 मजली बिहार भवन उभारण्याची योजना आहे. दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणेच मुंबईतील हे भवन देखील सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, बैठकींसाठी 72 आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग, तसेच अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार आहे. हा भव्य प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेट येथे उभारला जाणार असून, यासाठी सुमारे 0.68 एकर म्हणजेच 2752.77 चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या इमारतीसाठी सुमारे 314.20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी STP प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र या सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
कोण आहेत अनिल चौधरी?
अशोक चौधरी हे बिहारमधील नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते बरबिघा विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 पासून ते बिहार विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये भवन निर्माण खात्याचे मंत्री होते. त्यांनी शिक्षणमंत्रीपदही भुषविले आहे. ते सध्या बिहार सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री आहेत.


