Devendra Fadnavis : सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या स्थानिक राजकारणावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप ओढला आहे. अकोटमध्ये भाजप–MIM आणि अंबरनाथमध्ये भाजप–काँग्रेस युती झाल्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असताना, फडणवीस यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत “ही युती खपवून घेतली जाणार नाही” असा ठाम इशारा दिला आहे.
“काँग्रेस आणि MIM सोबत युती होऊच शकत नाही” : फडणवीस
एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काँग्रेस आणि MIM सोबत कोणत्याही परिस्थितीत युती होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी अशी युती झाली असेल, तरी ती चुकीची आहे. ज्यांनी हा निर्णय घेतला असेल, त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल.” मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अकोटमध्ये नेमकं काय घडलं?
अकोट नगरपरिषदेत भाजपला बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी थेट MIM सोबत हातमिळवणी करण्यात आली. भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला असून, या आघाडीत भाजपसह MIM, शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी झाले आहेत.
भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर गटनेते असतील आणि सर्व नगरसेवकांना भाजपचा व्हिप लागू राहणार आहे. १३ जानेवारीला होणाऱ्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत ही आघाडी एकत्र मतदान करणार आहे. बहुमतासाठी भाजपने थेट MIM सोबत युती केल्याने हा प्रकार पक्षाच्या धोरणाविरोधात असल्याची टीका होत आहे.
अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस हातमिळवणी
अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेस थेट एकत्र आले. शिंदे गटाला दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेससोबत आघाडी करत नगराध्यक्षपद मिळवलं. भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. मात्र, काँग्रेससोबत युती करून शिवसेना शिंदे गटाला डावलल्याने प्रचंड वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी या युतीला “अभद्र” संबोधत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भाजपची कोंडी, फडणवीसांचा थेट इशारा
एकीकडे देशपातळीवर “काँग्रेसमुक्त भारत”ची घोषणा, तर दुसरीकडे स्थानिक सत्तेसाठी काँग्रेस आणि MIM सोबत युती या दुटप्पी भूमिकेमुळे भाजप अडचणीत सापडला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या थेट इशाऱ्यानंतर संबंधित स्थानिक नेत्यांवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


